मनपा अभियंत्यांचा मेळा... तिथेच पाणी होते गोळा!

Foto
उपायुक्‍त रवींद्र निकम यांच्या घरालाच पावसाच्या पाण्याचा वेढा
 एक कोटी खर्चूनही परिस्थिती जैसे थे 
 रहिवाशांची मनपा आयुक्‍तांना साद
 रविवारी सायंकाळी पाच वाजेची वेळ ! सिडको एन -6 साई नगरातील मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांचे घर गुडघाभर पाण्याने वेढले गेले...निकम यांच्यासह  मनपाचे सात अभियंते याच परिसरात राहतात. येथील तब्बल 70 घरे दीड तास पावसाच्या पाण्याने वेढली गेली. बरे, याच पाण्याचा निचरा होण्यासाठी गेल्या दहा वर्षात मनपाने तब्बल 1 कोटींचा खर्च केला आहे. खर्चही पाण्यात अन अभियंत्यांची घरेही पाण्यात असाच काहीसा प्रकार !
धो धो पाऊस पडला की शहरातील शेकडो वसाहती पाण्याखाली जातात. अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरते. वर्षानुवर्षाची ही स्थिती काही बदलत नाही. चुकीच्या पद्धतीने कामे केली की असेच होणार यात शंका नाही. आता तर खुद्द मनपा उपयुक्तांनाच याचा फटका बसलाय. मनपाच्या कार्यपद्धतीचा नमुना पहायचा असेल तर धो-धो पावसात तुम्हाला साईनगरात यावे लागेल. उपायुक्त रवींद्र निकम यांचे निवासस्थान याच भागात.  चिस्तिया पोलीस चौकीकडून मुख्य रस्त्याने वाहणारे धो-धो पाणी आणि साई नगरातील तब्बल चार रस्त्यांना मिळणारे पाणी एकत्र जमा होऊन सुसाट वेगाने धावते. बरे या परिसरात मनपाच्या बड्या अधिकारांचा निवासस्थान असल्याने महानगरपालिकेने प्राधान्याने निधी मंजूर केला. पहिल्या टप्प्यात तब्बल 45 लाखाचे काम करण्यात आले. मात्र घडले ते वेगळेच ! धो धो पाऊस पडला की परिसरातील तब्बल सत्तर घरे पाण्यात डुंबतात. अखेर प्रत्येकाने आपापली घरे पाच  फूट उंच केले आता तरी पाणी घरात शिरणार नाही असे वाटून सुस्कारा सोडला. तरीही अवकाळी पावसाने रहिवाशांचा पिच्छा सोडला नाही.
उपायुक्तांची घर पाण्यात !
काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास या परिसरात धोधो पाऊस कोसळला. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या घरासमोर पाण्याचे तळे साचले. त्याच बरोबर मनपाचे अभियंते विटेकर, जोशी, संगेवार, बोईनवाड, इंजिनीयर पंडित अशा दिग्गज अभियंत्यांची घरे तासभर पाण्याने वेढली गेली. पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी ज्या अभियंत्यांवर आहे. त्यांचीच घरे पाण्याखाली गेली.
झिक झाक पद्धतीने केले काम!
मनपाने पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेले काम अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडवून झेड पद्धतीने हे काम करण्यात आले. त्यामुळे जोराचा पाऊस पडला की वेगाने पाण्याचा निचरा होण्याऐवजी पाण्याचा वेग मंदावतो.
मनपा आयुक्‍तांना साकडे!
 महापारेषणचे निवृत्त कर्मचारी माधव मोरतळे गेल्या दहा वर्षांपासून या प्रश्नावर भांडत आहेत. आता त्यांनी थेट मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्याकडे कैफियत मांडली आहे. कोट्यवधींचा खर्च अशा प्रकारे चुकीचे काम केल्याने वाया गेल्याचा दावा मोरतळे करतात.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker